कांदा बियाणे बनविण्याकडे शेतकर्‍यांचा कल   

बेल्हे, (वार्ताहर) : आळेफाटा परीसरात शेतकर्‍याचा कांदा बियाने बनवण्याचे कल वाढलेला दिसत आहे. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात कांद्याचे बियाणे बनविण्यासाठी टाकले आहे. परिसरात बीजोत्पादनासाठी लावलेले कांदे बी भरण्याच्या अवस्थेत असून हे शेत अतिशय मनमोहक चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता, त्यातच अवकाळी व अति पर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांचे नुसकान झाल्यामुळे कांदा बियाण्यांना सोन्याचा बाजारभाव प्राप्त झाला होता.
 
एक हजार रुपयांना मिळणारे कांदा बी तीन ते चार हजार रुपये पर्यंत बाजारभावाने शेतकर्‍यांनी खरेदी केले होते. त्यातच कंपन्यांकडून आलेल्या बोगस बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. या भेसळयुक्त बियाण्यांमुळे ४० टक्के क्षेत्रावर डेंगळे आल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या कांद्याला बाजारभाव अतीशय कमी असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसल्यामुळे यंदा परिसरात शेतकर्‍यांनी कांदा बियाणे बनविण्यासाठी शेतात बी टाकले असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी रघुनाथ हाडवळे यांनी सांगितले.
 
कांदा बी तयार करण्यासाठी नैसर्गिक परागीकरण होणे गरजेचे असते. यासाठी मधमाशी हा महत्त्वाचा घटक असतो. अलीकडच्या काळात मधमाशांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. अतिशय प्रभावी कीटकनाशकांच्या बेसुमार फवारणीने मधमाशीचे जीवनचक्र संपुष्टात आले आहे. परागीकरण न झाल्याने कांदा बीजोत्पादन घेणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. कांदा बियाणे तयार करणारा प्लॉट यावर्षी जोमात असून मधमाशी यांचा तुटवडा असल्याने परागीकरण न झाल्याने अनेक गोंडे मोकळे आहेत. मधमाशीचे वास्तव्य नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येणार आहे.

Related Articles